व्हॉट्सऍप कट्टा   

लोकमान्यांनीही अनुभवला होता ब्रह्मदेशातील भूकंप 
 
म्यानमारमध्ये झालेला भूकंप सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मंडाले कारागृहात असताना लोकमान्यांनी तेथील भूकंपाचा अनुभव घेतला होता.
 
लोकमान्य टिळकांनी अनुभवलेला भूकंपाचा पहिला प्रसंग म्हणजे मंडाले तुरुंगात ते राजद्रोहाच्या आरोपावरुन शिक्षा भोगत असताना! १९०९ च्या मे महिन्यात लोकमान्य, पाच वाजता संध्याकाळचे जेवण उरकून जिन्याच्या पायर्‍यांवर बसून आचार्‍याशी गप्पा मारीत होते. इतक्यात जिना हादरला. भूकंप झाला हे टिळकांच्या लक्षात येऊन ते आवाराच्या उघड्या जागेत चटकन गेले. हा धक्का हलका होता. 
 
त्यांना जो दुसरा अनुभव तीन वर्षांनी आला तो पूर्वीसारखा हलका नव्हता. गुरुवार, दिनांक २३ मे १९१२ रोजी हा भूकंप ब्रह्मदेशाच्या उत्तर भागाला चांगलाच जाणवला. शहरातील एक बौद्ध व दुसरे ख्रिस्ती अशा दोन मंदिरांचे बरेच नुकसान झाले. तुरुंगाच्या वीस फूट उंचीच्या व चार फूट जाडीच्या तटाला बर्‍याच ठिकाणी वरपासून खालपर्यंत तडे गेले. तुरुंगातली घरे लाकडी असल्यामुळे ती बचावली. लोकमान्य त्या वेळी बराकीच्या उघड्या अंगणात जाऊन उभे राहिले होते. हा भूकंप दोन मिनिटांचा होता.
 
- शैलेश रिसबूड
मो. ९८१९५३८०९३
(न. र. फाटक यांच्या ‘लोकमान्य’ ग्रंथातील
‘मंडालेचे कारातीर्थ’ या प्रकरणातून)
--------------
बाबा वय झाल्याने तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालायचे. ते जिथे जिथे भिंतीला हात लावत त्या ठिकाणाचा भिंतीचा रंग पुसट व मळकट होई. ते पाहून माझ्या बायकोच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो.
 
त्या दिवशी बाबांचे डोके दुखत होते म्हणून कोण जाणे त्यांनी डोक्याला  कोणते तरी तेल लावले होते. त्याच तेलकट हाताने भिंतीला धरून चालल्याने, हाताचे ठसे भिंतीवर उमटले. 
ते पाहून बायको माझ्यावर जाम भडकली. मला पण काय झाले कुणास ठाऊक, मी तडक बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणलो बाबा, भिंतीला हात न लावता चाला ना जरा. तुमचे हात लागून त्या किती घाण होतात!
 
माझा आवाज जरा उंच झाल्यासारखे मला वाटले.ऐंशी वर्षाचे बाबा, एखादा लहान मुलगा चूक झाली असता जसा चेहरा करतो तसा करुन मान खाली घालून गप्प बसले.
छे! ’हे मी काय केले! मी असं नको म्हणायला हवे होते असे वाटायला लागले. माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले. त्यानी भिंतीला धरुन चालणं सोडून दिले. पुढे चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले. त्यांनी अंथरुण धरले. पुढे दोन दिवसांनी त्यांनी इहलोक यात्रा संपविली.
 
भिंतीवरच्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काही तरी अडकल्यासारखे वाटत राही. दिवस ऊलटत राहिले. माझ्या बायकोला घर रंगवून घ्यावे असे वाटू लागले. पेंटर आले सुद्धा.
माझा मुलगा जितूला आजोबा म्हणजे प्राण प्रिय. भिंती रंगविताना आजोबांच्या हाताच्या ठशांना सोडून भिंत रंगविण्याचा हट्टच धरला त्याने.
शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले,  सर, काही काळजी करू नका.  त्या ठशाच्या भोवती गोल करून छान डिझाईन काढून देतो. तुम्हालाही ते आवडेल.  शेवटी मुलाच्या हट्टापुढे काही चालले नाही. 
 
पेंटरने ठसे व्यवस्थित ठेवून भोवतीने सुंदर डिझाईन करून दिले. पेंटरची आयडिया घरातील आणि घरी येणार्‍या पाहुणे, मित्र मंडळींना पण आवडली. ते या कल्पनेची खूप स्तुती करून जाऊ लागले. आता पुढे जेव्हां भिंती रंगवण्याचे काम होत गेले तेव्हा त्या हाताच्या ठशा भोवतीचे डिझाईन बनविले जाऊ लागले. सुरुवातीला मुलाच्या हट्टापायी हे करत राहिलो तरी आमचेही समाधान  होई.
 
दिवस, महिना, वर्ष पुढे सरकत चालले. मुलगा मोठा होऊन त्याचे लग्न झाले तसा मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहचलो. बाबांच्या एवढा नसलो तरी सत्तरीला येऊ लागलो. मलाही तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालावं वाटू लागलं व मला आठवू लागले, किती चिडून बोललो होतो बाबांना  मी....!   म्हणून चालताना भिंतीपासून थोडे अंतर ठेवूनच चालू लागलो. त्या दिवशी रूम मधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखं झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या मिठीमध्ये असल्याचे जाणवले. अहो बाबा! बाहेर येताना भिंतीला धरून यायचं ?
 
आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचलात ! मुलाचे वाक्य कानावर पडले. मी  जितूच्या तोंडाकडे पाहत राहिलो. त्याच्या चेहर्‍यावर चिंता होती पण राग नव्हता. जवळच्या भिंतीवर मला बाबांचे हात दिसले. माझ्या डोळ्यापुढे बाबांचे चित्र उभं राहिले. त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असे वाटू लागले. आपोआप डोळ्यात पाणी साचले. तेवढ्यात आठ वर्षाची नात धावत आली.       
 
आजोबा, आजोबा !  तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला म्हणत, हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली. हॉलमधील सोफ्यावर बसलो असता नातीने आपले ड्रॉईंगबुक दाखवत, आजोबा! आज क्लासमध्ये ड्रॉईंग परीक्षा झाली मला फर्स्ट प्राईझ मिळालं, असे म्हणाली.
हो का? अरे व्वा! दाखव बघू कोणतं ड्रॉईंग आहे?असे म्हटल्यावर तिने ड्रॉइंगचं पेज उघडून दाखविले. भिंती वरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे तसे काढून भोवतीने सुंदर नक्षी काढली होती आणि म्हणाली, टीचरनी हे काय आहे म्हणून विचारले. 
 
मी सांगितले- माझ्या बाबांच्या वडिलांच्या हाताचे चित्र आहे. आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र कायमचं कोरून ठेवलंय. टीचर म्हणाल्या, मुले लहान असताना भिंतीभर रेघोट्या, हातापायाचे चित्र काढत राहतात. मुलांच्या आई बाबाना त्यांचे कौतुक वाटते. त्यामुळे मुलांवर त्यांचे प्रेमही वाढत राहते. टीचर आणखी म्हणाल्या, आपण पण वयस्कर आई वडील, आजी आजोबांवर असेच प्रेम करत राहायला पाहिजे. ...त्यांनी व्हेरी गुड श्रेया असे म्हणून माझे कौतुक केले. श्रेया (आमची नात) गोड गोड बोलत राहिली तेव्हा माझ्या नाती पुढे मी किती लहान आहे असे वाटू लागले.मी माझ्या रूममध्ये आलो. दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटो पुढे येऊन मला क्षमा करा बाबा असे म्हणत मन हलके होईपर्यंत वरचेवर रडत बाबांची क्षमा मागत राहिलो......!
 
(व्हॉट्सअ‍ॅप वरुन साभार)
-------------
एकदा गंगेला विचारण्यात आले. तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात. त्या सर्व पापांचे तू काय करतेस? 
ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले. 
तू त्या पापांचे काय करतोस? 
समुद्र म्हणाला मी ते ढगात नेऊन टाकतो. 
ढगाला विचारले.. तु काय करतो त्या पापांचे? 
ढग म्हणाला मी पावसाच्या स्वरुपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. 
लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार.
भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी रहा. 
ठेवले अनंते तैसेची रहावे चित्ति असू द्यावे समाधान...
------------
समस्या प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात.. वाईट, नकोसे प्रसंग घडत असतात.. मात्र त्यातून खचून जाऊन नकारात्मक मानसिकता तयार न करता सकारात्मकता टिकवून ठेवलीच पाहिजे आणि जो आहे त्याच मार्गावर कार्यरतही राहीलं पाहिजे.. कारण एक वाईट अनुभव आला की संपलं सगळं असं नसतं ना.. जीवनाच्या वाटेवर वेळोवेळी असे प्रसंग येतच असतात.. त्यांची तिच तर नियती आहे.. म्हणून काय सकारत्मकता नाहीशी होत नसते.. उलट नकारात्मक विचारांनी असलेल्या कामावरही परिणाम होतो.. सरता काळ हा प्रत्येक दुःखांवरचं औषध असतो.. म्हणून अपयश किंवा दु:खाने खचून न जाता पुढचा प्रवास सुरुच ठेवला पाहीजे...
------------
पाण्याचा तळ स्वच्छपणे दिसला की, पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही. तसंच, माणसाच्या मनाचा तळ समजला की, सहवासाची भीती वाटत नाही. फक्त लक्षात ठेवायचं-तळ गाठला की थोडा गाळ दिसणारच. त्याकडे दुर्लक्ष करण्याइतके आपले मन नितळ हवे!
------------
सगळं व्यवस्थित करून पण काहीच व्यवस्थित होत नसेल 
तर समजून जा की तुमच्या आयुष्याचा न्यूझीलंड झालाय...
------------
चम्प्या : तू उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस..?
चिंगी : सहा..
चम्प्या : चूक...फक्त १
कारण १ सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशीपोटी नसतेस...
चिंगी : मस्त सूपर जोक आहे हा...
मग ती चिंगी आपल्या मैत्रिणीला हा जोक सांगायला जाते..
सांग गं मयुरी तू उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस..?
मयुरी : नऊ..
चिंगी : तू ६ बोलली असतीस तर मी तुला एक मस्त जोक सांगणार होते.
-----------

Related Articles